मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

सहवास पर्व सुरू - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १३)


नियती महापुरुषांना उदंड गुणवत्तेचे वरदान देते. त्याच वेळी त्यांचे आयुर्मान हिरावून घेते. विवेकानंदांच्या बाबतीत तेच घडले. उभ्या भारताची यात्रा करणारे, दोन वेळा अमेरिकेत जाऊन येणारे, युरोपचा काही भाग पाहणारे, ब्रिटिशांच्या राजधानीत आपल्या भाषाप्रभुत्वाने आणि ज्ञानविज्ञान संपन्नतेने अनेकांना प्रभावित करणारे, भगिनी निवेदितांसारख्या प्रज्ञासंपन्न सुकन्यांचा भक्तिभाव संपादन करणारे विवेकानंद केवळ चाळीस वषेर् भूतलावर राहिले. त्यातले काही दिवस कालपुरुषाने हिरावून घेतले.

विवेकानंदांना लहानपणापासून मधुमेहाचा विकार होता. त्या काळी हा विकार रोखण्याचे प्रभावी मार्ग जगाला माहीत नव्हते. विवेकानंद उत्तम खेळाडू होते. सुदृढ बांध्याचे होते. शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या भाषाज्ञानाचे कौतुक होत असे. संस्कृत, इंग्रजी, बंगाली, पशिर्यन, फ्रेंच अशा विविध भाषांतून ते विचारविनिमय आणि सहज संवाद करीत.

त्यांना मनातून परमेश्वराची ओढ वाटत असे. पण जगाच्या रचनेत अनेक त्रुटी ठेवणारा परमेश्वर असे का करतो याचे कोडे पडत होते. कधी कधी ते म्हणत : ''स्वर्गात सिंहासन देणारा; पण भूतलावर भाकरीची भ्रांत पाडणारा लहरी देव मला मान्य नाही.''

त्यांचे मन हे एक कुरुक्षेत्र झाले होते. अनेक परस्परविरोधी विचारांचे संगर तेथे चालत असे. त्यांनी विवाह टाळला. संसार हा विचार सोडला. नोकरी, व्यवसाय, दव्यलाभ यांचे गणित मांडले नाही. ते जीवनाचे पूर्ण वेळ अभ्यासक व उपासक म्हणून जगले. जीवनाची अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा परमतत्त्वांचे चिंतन, संशोधन केले. त्यासाठी पातंजल योग अभ्यासला. गुरूचा शोध घेतला आणि शेवटी ते रामकृष्णांच्या चरणी थांबले.

रामकृष्णांना विदेही स्थितीत विवेकानंदांचे पूर्वजन्म आणि भविष्यकालीन कार्य यांचे आकलन घडले. ते त्यांनी आपल्या मनात ठेवले. विवेकानंदांना अधिकारी मार्गदर्शक हवा होता. रामकृष्णांना आपल्या साधनेची गाथा ज्याला समजावून द्यावी असा अधिकारी शिष्य हवा होता. नियतीने ही गाठभेट घडवून आणली.

रामकृष्णांचा साधनाकाल संपला आणि त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. या अवस्थेत कोलकात्यातील अनेक विद्वान, अधिकारी, समाजपुरुष त्यांच्याकडे आकृष्ट झाले.

विवेकानंदांना ओळखणारे सुरेंदनाथ मित्र, रामचंद दत्त, व्रजेंदनाथ सील असे काही सांगाती होते. त्यांनी त्यांना सांगितले की, ''तू शेलीच्या कविता वाच. रामकृष्णांना भेट.'' प्राचार्य हेस्टी यांनी पण तेच सुचविले.

विवेकानंदांचे आजोबा पारमाथिर्क होते. आई भाविक होती. वडील मात्र रसिक, विद्वान पण अज्ञेयवादी होते. परमेश्वर हा त्यांच्या लेखी एक गौण आणि अर्थशून्य विषय होता. त्यांना पशिर्यन काव्य फार आवडे. त्यांच्या दिवाणखान्यात रसिकांची आणि पंडितांची सभा भरे. या सभेत बाल नरेन्दाला आनंदाने आणि अगदी बरोबरीने सामावून घेतले जात असे.

आई रामायण महाभारताचे वाचन करीत असे. तशी ती व्रतस्थ होती. विवेकानंदांच्या जन्मापूवीर् तिने काशीच्या विश्वेश्वराला नवस केला होता. त्याला एक लक्ष बिल्वदले वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. विवेकानंदांचा जन्म झाला आणि आईने असे गृहीत धरले का आपला सुपुत्र हा शिवाचा अंशावतार आहे. मुलाचा व्रात्यपणा असह्य झाला म्हणजे रागाने म्हणत असे : शिवाला मी पुत्र मागितला आणि त्याने हा रुद धाडला.

अशा अपवादभूत आणि विलक्षण मुलाला वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. विवेकानंदांचे शिक्षण वारंवार खंडित झाले. प्रगती पुस्तकात गुणसंख्येची झगमग कधी दिसली नाही. ते बी. ए. ची परीक्षा द्वितीय श्ाेणीत उत्तीर्ण झाले. तथाकथित गुणवत्ता यादीची तमा त्यांनी बाळगली नाही. पूवीर् हे शैक्षणिक वेड विकोपाला गेले नव्हते.

विवेकानंदांना ऑफिसर, वकील, डॉक्टर, इंजिनिअर असे काहीच व्हावयाचे नव्हते. त्यांना कृतार्थ आणि अर्थपूर्ण जीवन तपस्यापूर्वक जगावयाचे होते. जीवनाची महत्ता आणि अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा तत्त्वांचा शोध आणि बोध हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासाने त्यांना रानोमाळ फिरवले आणि रामकृष्णांच्या पुढे उभे केले. या दोन व्यक्तिमत्त्वांची युती हा एक विलक्षण योग होता. दोघांच्या दर्शनी रूपात आणि जीवनशैलीत फरक होता.

रामकृष्णांची शाळा सुरुवातीलाच सुटली होती. ते बोलताना अडखळत. त्यांची अंगकाठी बेताची होती. ते समाजात फारसे फिरले, वावरले नव्हते. दक्षिणेश्वर आणि कोलकाता आणि त्यांचे जन्मगाव कामारपुकूर या परिघात ते राहिले, वावरले. एखादी तीर्थयात्रा एवढाच काय तो अपवाद! या उलट विवेकानंद हे राजबिंडे, रुबाबदार, व्यासंगी, वक्तृत्वसंपन्न, क्षात्रतेजाने तळपणारे, दिग्विजयी आणि विश्वसंचारी होते.

विवेकानंद हे कोणाची तमा बाळगणारे, कोणापुढे नमणारे किंवा कशानेही दीपून अथवा भारावून जाणारे नव्हते. रामकृष्णांकडे कोलकात्त्यातील मान्यवर आणि महाज्ञानी जात असत. यामुळे विवेकानंदांना त्यांचे कौतुक वाटे, त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. अनेक वर्षांच्या सावध सहवासातून, अगदी तावून सुलाखून घेतल्यावर त्यांनी हे जाणले की ''पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच हा रामकृष्ण.''

रामकृष्ण-विवेकानंद यांचे सहवासपर्व, संवादपर्व हे एक परमार्थ रामायण ठरले.

या रामायणात संस्कृतीचे सार आहे. सर्व धर्मांचा आशय आहे. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश आहे. भगवान बुद्धांची करुणा आहे. शंकराचार्यांचा विवेक आहे. सॉक्रेटिसाचा संवाद आहे. जे-जे अर्थपूर्ण ते सर्व आहे. प्रगल्भ मनुष्यत्व आणि पारमाथिर्क दिव्यत्व यांचा प्रकाश आहे. चंदाच्या दिशेने झेप घेणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातील विकल्प दूर करण्याची शक्ती आहे. निरासक्त संन्यस्तांची मानसिक श्रीमंती दुरिताचे तिमिर घालवू शकेल असा गाढ विश्वास आहे.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा